अकोला जिल्ह्यात आज 16 लाखांहून अधिक मतदारांच्या हाती 111 उमेदवारांचे भवितव्य आहे.

0
45

अकोला : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण 111 उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भवितव्य 16 लाख मतदारांच्या हाती आहे. मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत 1741 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अकोला पूर्व 21, अकोला पश्चिम 22, अकोट 19, बाळापूर 29 आणि मूर्तिजापूर 20 मतदारसंघात एकूण 111 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या पाचही मतदारसंघात एकूण 16 लाख 37 हजार 894 मतदार आहेत. जिल्हा मतदानासाठी 1741 मतदान केंद्रांवर 2280 मतदान केंद्राध्यक्ष आणि 6844 मतदान अधिकारी अशा एकूण 9124 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर वाहतुकीसाठी 121 एसटी बस, 51 मिनी बस, 34 जीप आणि 233 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मतदान प्रक्रियेत नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी १० हजार २०२ टपाली मतपत्रिकांचे वितरण केले. ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व व ८५ वर्षांच्यावरील मतदानांसाठी गृहमतदानाची सुविधा होती. त्यामध्ये अर्ज केलेल्या २९१५ मतदारांपैकी २७३७ जणांना आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. गृहमतदानाची टक्केवारी ९३.८९ टक्के आहे. मतदारसंघनिहाय क्षेत्रिय अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले असून त्‍यांना कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार प्रदान केले. क्षेत्रिय अधिकारी यांना मतदान केंद्रे नेमून दिले आहेत. मतदान केंद्रांवर कुठल्‍याही प्रकारची अडचण उद्भवल्‍यास त्‍याचे निराकरण करण्‍याचे प्रशिक्षण त्‍यांना देण्‍यात आले आहे. जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये १५३ क्षेत्रिय अधिकारी कार्यरत राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

३७४९ जवानांकडून चोख सुरक्षा व्यवस्था

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक (पोलीस) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेत १३९९ पोलिस, १३८६ होमगार्ड, ८०० सीएपीएफ, १६४ एसआरपीएफ असे एकूण ३७४९ जवान कार्यरत आहेत.

९५.३१ टक्के चिठ्ठ्यांचे वाटप

मतदार यादीमध्‍ये नाव समाविष्‍ट मतदारांना यादीतील तपशील तसेच केंद्रांची आवश्‍यक माहिती मिळण्यासाठी घरोघरी जाऊन चिठ्ठीचे वितरण केले. मतदानाचे वेळी सदर मतदार माहिती चिठ्ठी दाखवून मतदारांना आपला मतदानाचा हक्‍क बजावता येईल. जिल्ह्यात ९५.३१ टक्के चिठ्ठ्यांचे वितरण झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here