Kalyan Crime : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता अशाच प्रकारची एक घटना कल्याणमध्ये घडली आहे. एका १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. त्याआधी तिचं अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे.
नेमकी काय घटना घडली?
२३ डिसेंबरच्या संध्याकाळी १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी आईकडून २० रुपये घेऊन खाऊ आणायला गेली होती. त्यावेळी ती घरी परतली नाही. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांनी तिची शोधाशोध सुरु केली. मात्र तिचा काहीही पत्ता लागला नाही. मुलीच्या पालकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. ज्यानंतर पोलीस या मुलीचा शोध घेत होते. २४ डिसेंबरला पोलिसांना कल्याणजवळच्या बापगाव या ठिकाणी अल्पवयीन मुलीचा मृतदेह फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आला. हा मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. ज्यानंतर ही बाब समोर आली की मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे. या घटनेच्या विरोधात कल्याणच्या नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.