त्याने’ अनेकांचे प्राण वाचविले; पण त्याचा जीव धोक्यात आला तेव्हा

0
32

नियती, नशीब कधी काय करेल याचा कुणीच अंदाज व्यक्त करू शकत नाही, असे म्हणतात. लोणार तालुक्यातील एका अपघातात याचा दुर्देवी प्रत्यय आला.

बुलढाणा: नियती, नशीब कधी काय करेल याचा कुणीच अंदाज व्यक्त करू शकत नाही, असे म्हणतात. लोणार तालुक्यातील एका अपघातात याचा दुर्देवी प्रत्यय आला. रात्रीचा दिवस करून आणि कधी कधी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या एका इसमाचा अपघाती मृत्यू जनमानसाला सुन्न करणारा ठरला. अक्षय उकंडा असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. तो लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू (आईचा तांडा) येथील राहणारा होता. रुग्णवाहिका चालक असलेल्या अक्षय आणि त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह यातून तुटपुंज्या कमाईतून भागविला जायचा. काल मंगळवारी रात्री उशिरा तो चालवित असलेल्या रुग्णवाहिकेला एका भरधाव मालवाहू वाहनाने धडक दिली.बीबी दुसरबीड मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की रुग्णवाहिका समोरून ओळखू न येण्याइतकी चेपल्या गेली. यामुळे चालक अक्षय जागीच दगावला.

या अपघातात त्याचा साथीदार , रुग्णवाहिकेचा वाहक राजेश्वर वाकळे (३०राहणार वाशी) हा गंभीर जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार रुग्णवाहिका बीबी कडून दुसरबीड कडे जात होती. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ‘ट्रक’ने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच (लोणार तालुक्यातील )बीबी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. जखमी वाहक राजेश्वर वाकळे याच्यावर आधी बीबी( तालुका लोणार) येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले. या दुदैवी घटनेचा पुढील तपास बीबी पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे बीबी परिसरासह लोणार तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here