महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्याची घोषणा आज रात्री किंवा उद्या सकाळी होऊ शकते. देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत.
रात्री साडेदहा वाजता ते अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचा दावा भाजपशी संबंधित सूत्रांनी केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला ठरला आहे. महायुतीमध्ये प्रत्येक 6-7 आमदारांमागे एक मंत्रीपदाचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे. त्यानुसार भाजपचे 22-24, शिंदे गटाचे 10-12 आणि अजित गटाचे 8-10 आमदार मंत्री होऊ शकतात.
26 नोव्हेंबरपर्यंत राज्यात सरकार स्थापन होणार आहे. याचे कारण म्हणजे या दिवशी विधानसभेचा कार्यकाळ संपत असून, सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरे यांची विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात पक्षाच्या संयुक्त नेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या (UBT) विधिमंडळ पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांची तर सुनील प्रभू यांची मुख्य सचेतक म्हणून निवड करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, पक्षाने त्यांना या पदावर कायम राहण्यास सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी काँग्रेसचे तिकीट वाटप केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 16 जागा जिंकल्या. गेल्या निवडणुकीत काँग्रेसची मतांची टक्केवारी 16.1% होती, ती आता 12.42% वर आली आहे.