ludhiana AAP MLA Gurpreet Bassi Gogi dies : पंजाबमधील लुधियाना पश्चिमचे आमदार व आम आदमी पार्टीचे नेते गुरप्रीत बस्सी गोगी यांचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. त्यांना जखमी अवस्थेत दयानंद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. मात्र, त्यांची स्थिती इतकी गंभीर होती की डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत..
गोगी हे शुक्रवारी (१० जानेवारी) रात्री एक कार्यक्रम आटपून घरी परतले होते. ते त्यांच्या खोलीत बसून जेवत असताना बंदूकीच्या गोळीचा मोठा आवाज कानावर पडला. त्यानंतर त्यांची पत्नी डॉ. सुखचन कौर गोगी या गुरप्रीत यांच्या खोलीत गेल्या. गुरप्रीत गोगी हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले होते. सुखचन यांनी गुरप्रीत यांना ताबडतोब रुग्णालयात नेलं. मात्र, रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार गुरप्रीत बस्सी गोगी यांना त्यांच्याच पिस्तुलातून सुटलेली गोळी लागली आहे. गोळी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ज्या पिस्तुलातून सुटलेली गोळी त्यांना लागली होती त्या पिस्तुलाचा गोगी यांच्याकडे परवाना होता. दरम्यान, गोगी यांना रुग्णालयात नेत असतानाच रुग्णालय प्रशासनाला सर्व माहिती पुरवण्यात आली होती. जेणेकरून रुग्णालयात डॉक्टरांचं पथक सज्ज असेल आणि त्यांच्यावर उपचार करण्यास वेळ लागणार नाही. मात्र, डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले….