Bengaluru Crime News : बंगळुरूमध्ये नुकतेच एका जोडप्याने आपल्या दिव्यांग मुलीसह मुलाला विष पाजत आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीसांनी सुरू केला असून, मालमत्तेशी संबंधित फसवणूक आणि त्यांच्या मुलीच्या अपंगत्वामुळे या जोडप्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान अनुप कुमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी भावाला पाठवलेल्या ई-मेलमध्ये कठीण काळात आई-वडिलांनी मदत न केल्याचे नमूद केले आहे.
अनुप कुमार (३८), पत्नी राखी (३५), त्यांची पाच वर्षांची मुलगी आणि दोन वर्षांचा मुलगा सोमवारी सकाळी बंगळुरूमधील आरएमव्ही सेकंड स्टेज परिसरात एका भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळले. हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे आहे. सॉफ्टवेअर सल्लागार म्हणून काम करणाऱ्या अनुप कुमार यांनी ४५ दिवसांपूर्वी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. तर, त्यांच्या पत्नी राखी गृहिणी होत्या. दरम्यान काही अडचणींमुळे अनुप कुमार पुण्याला स्थलांतरित होण्याचा विचार करत होते. पण, त्यापूर्वी त्यांनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले……………