अमरावती : डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला असताना त्याचे धोकेही समोर आले आहेत. विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगात संगणक हाताळताना सुरक्षित राहता यावे, वेळीच त्याचे चांगले-वाईट परिणाम ओळखता यावे, यासाठी देशभरातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी सायबर सुरक्षेसाठी अभियान राबवावे, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. यासाठी यूजीसीने विशेष माहितीपुस्तिका देखील तयार केली आहे……..
विविध शाळांसोबतच महाविद्यालयांचे आणि विद्यापीठांचे वर्ग ऑनलाइन भरू लागल्यामुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न शैक्षणिक संस्थांसाठी आव्हानात्मक बनला आहे. याच पार्श्वभूमिवर यूजीसीने सायबर सुरक्षेविषयीची ही माहितीपुस्तिका प्रकाशित केली आहे. देशभरातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्था यांना ही माहितीपुस्तिका पाठवण्यात आली असून त्यात प्रामुख्याने शिक्षक व प्राध्यापकांच्या प्रशिक्षणावर भर दिला आहे.