मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवर तीन नव्या मालिका मोठ्या स्टार कास्टसह एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’, ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकांचे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या मालिकांपैकी ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमध्ये नायक-नायिकेच्या २ जोड्या पहायला मिळणार असून, मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विजय आंदळकर आणि विवेक सांगळे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या शोच्या प्रोमोचेही विशेष कौतुक झाले आणि वेगळा विषय पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांनी उत्सुकता व्यक्त केली. मृणालच्या कमबॅकसाठीही चाहते उत्सुक आहेत, असे असताना तुम्हाला माहितेय का ही मालिका एका लोकप्रिय मालिकेचा रिमेक आहे?
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका पुढील महिन्यात १६ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. मालिकेत ४ कलाकार मुख्य भूमिकेत असल्याने दोन जोड्यांची कथा यामध्ये पाहायला मिळेल. मात्र या चौघांच्या भाग्याच्या रेषा नेमक्या कोणाच्या कोणासोबत जुळल्या गेल्या आहेत, याबद्दल कोड्यात टाकणारा प्रोमो अलीकडेच रिलीज करण्यात आला. प्रोमो रिलीज होताच या चारही कलाकारांचे इंडस्ट्रीतील मित्र आणि चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की ही मालिकादेखील एक रिमेक आहे.
कोणत्या मालिकेचा रिमेक आहे मृणाल-ज्ञानदाची मालिका?
स्टार प्रवाहची ही नवीन मालिका तामिळ भाषेत २०२२ साली आलेल्या Eeramana Rojave २ ची कॉपी आहे. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मराठी मालिका या तामिळ मालिकेचा अधिकृत रिमेक आहे. आता मूळ मालिकेप्रमाणे ही मराठी मालिकाही हिट ठरेल का हे पाहणे महत्वाचे ठरेल.
दरम्यान या वाहिनीवर सुरू होणारी दुसरी मालिका म्हणजेच, ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका स्टार प्लसची लोकप्रिय मालिका ‘इस प्यार को क्या नाम दू’ची रिमेक आहे, जी २३ डिसेंबरपासून सुरू होईल. तर तिसरी नवीन मालिका, म्हणजेच ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ येत्या २ डिसेंबरपासून सुरू होईल.