अकोला : श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालामध्ये १९९२ च्या दंगल प्रकरणामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना व इतर हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांचे नाव आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने पुरावे असतांनाही कारवाई केली नाही, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला. मतदानापूर्वी काँग्रेसने याचे उत्तर द्यावे असे,आव्हान दिले.
ते बाळापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. 1992 च्या दंगलीत एक हजार मुस्लिम मारले गेले. 300 लोक बेपत्ता झाले. त्याची चौकशी करण्यासाठी सरकारने श्रीकृष्ण आयोगाची स्थापना केली. या प्रकरणात अनेकांना आरोपी करण्यात आले होते. तत्कालीन काँग्रेस सरकारने नसीम अलीफ खान यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने पोलिसांवर विश्वास नसल्याचे न्यायालयात सांगितले. 1999 नंतर सर्वोच्च न्यायालयात सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. ती याचिका 12 ऑगस्ट 2012 रोजी फेटाळण्यात आली.