अमरावती : पुढील मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील, असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले आहे. रवी राणा यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या परिवर्तनामध्ये उद्धव ठाकरेंनी सहभागी व्हावे, तिळगूळ खावे आणि गोड गोड बोलावे अशी विनंती आहे, असेही रवी राणा यांनी म्हटले आहे. युवा स्वाभिमान पक्षातर्फे रवी राणा यांच्या पुढाकाराने मंगळवारी मालखेड मार्गावरील हनुमान गढी येथे मकर संक्रांति निमित्त पतंग उत्सव ते आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना रवी राणा म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे आले आहेत. पुढच्या मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांसोबत दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी खुल्या मनाने स्वीकारले तर नक्कीच हे होईल.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जाणार आहे. त्यांच्यात नेतृत्वात आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा- युवा स्वाभिमान पक्ष रिंगणात उतरेल. कुठल्याही निवडणुकीत आम्ही एकत्रित राहू असेही आमदार रवी राणा यांनी सांगितले.