कराड: कासारशिरंबे (ता. कराड) येथे ऊसतोड मजुरांनी शिकार करण्याच्या उद्देशाने लावलेल्या सापळ्यात एक बिबट्या अडकला. ही बाब लक्षात आल्यानंतर गावच्या पोलीस पाटलांनी वनविभागात खबर दिली. यावर वनविभागाच्या पथकाने परिसरात शोधाशोध करून वन्य प्राण्यांच्या शिकारीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच ऊसतोड मजुरांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, सापळ्यात अडकलेल्या बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोकल्याने त्याचे प्राण वाचले.
प्रकाश बापूराव पवार, सुनील दिलीप पवार, विशाल दिलीप पवार, मिथून भाऊराव शिंदे, भिमराव बाबुराव पवार (सर्व रा. भालकी ता. भालकी, जि. बिदर, (कर्नाटक, सध्या ऊसतोड मजूर कासारशिरंबे ता. कराड) असे याप्रकरणी वन विभागाने गुन्हा नोंद केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन सापळे, तारेचा पिंजरा, लाकडी मूठ असलेली टोकदार लोखंडी सळई, तीन वाघरं, नायलॉन दोरी, क्लच वायरचा फास आदी शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.