Yogi Adityanath on Mahakumbh 2025 Stampede : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित केलेल्या महाकुंभ मेळ्याला आज गालबोट लागले. मौनी अमावस्येनिमित्त जमलेल्या भाविकांमुळे संगम घाटावर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी झाले असून अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमी वा मृतांची संख्या अद्याप अधिकृतरित्या सांगण्यात आलेली नसली तरीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेत भाविक गंभीर जखमी झाले असल्याचं म्हटलं आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्थिती पूर्वपदावर आणण्याकरता आखलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
योगी आदित्यनाथ म्हणाले, संगम घाटावर मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र आल्याने चेंगराचेंगरी झाली. पण घटनास्थळी प्रशासन सज्ज आहे. रात्री १ ते दोन वाजताच्या दरम्यान आखाडा मार्गावर अमृत स्नानासाठी भाविक जमले होते. तेथे बॅरिकेट्स लावण्यात आले होते. त्यावेळी बॅरिकेट्स निघाल्याने भाविक गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातत्याने प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवारी सायंकाळी ६ वाजल्यापासूनच घाटावर गर्दी वाढत गेली.