गुजरातमधील मेहसाणा येथे, आर्थिक संकट आणि सावकारांच्या छळाला कंटाळून एका जोडप्याने आणि त्यांच्या ९ वर्षांच्या मुलाने नर्मदा कालव्यात उडी मारून आत्महत्या केली.
मेहसाणा: गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील एका जोडप्याने आणि त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलाने आर्थिक अडचणींमुळे नर्मदा कालव्यात उडी मारून आत्महत्या केली. पोलिस उपअधीक्षक हार्दिक प्रजापती यांनी सांगितले की, धर्मेश पांचाळ (३८), त्यांची पत्नी उर्मिला (३६) आणि मुलगा प्रकाश यांनी शनिवारी काडी शहराजवळ आत्महत्या केली. प्रजापती म्हणाले की, उर्मिला आणि प्रकाश यांचे मृतदेह शनिवारी सापडले होते, तर धर्मेशचा मृतदेह आज सापडला. ज्या कारमधून ते येथे आले होते त्यातून एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. आमच्या प्राथमिक तपासानुसार, आर्थिक अडचणींमुळे कुटुंब तणावाखाली होते.
सावकारांनी त्रास दिला
या घटनेत अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, धर्मेशचे वडील खेताभाई पांचाळ यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या मुलाला जुन्या कर्जावरून सावकारांकडून त्रास दिला जात होता. त्यांनी आरोप केला आहे की, माझा मुलगा आणि त्याचे कुटुंब पाटण जिल्ह्यातील संतलपूर तालुक्यात राहत होते, जिथे तो ‘मेटल फॅब्रिकेशन’चे दुकान चालवत होता. व्यवसायात तोटा झाल्यानंतर त्याने कर्ज घेतले होते. सावकारांकडून होणाऱ्या छळामुळे त्याने आणि त्याच्या कुटुंबाने आत्महत्या केल्याचा मला संशय आहे.