मूर्तिजापूर: शहराचे माजी उपनगराध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रमुख नेते भारत जेतवानी यांचा वाढदिवस नुकताच झाला. या वाढदिवसानिमित्त आमदार हरीश पिंपळे यांनी भारत जेतवानी यांना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमुळे मूर्तिजापूरच्या राजकारणात नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.भारत जेतवानी हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते आहेत. पण दुसरीकडे हरीश पिंपळे भाजपचे आमदार आहेत. अशात, या दोन दिग्गज नेत्यांचा एकत्र फोटो पाहून अनेकांना आश्चर्य वाटले आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा फोटो समोर आल्याने, यामागे काही राजकीय समीकरणे तर नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. *काय आहे चर्चा?* या फोटोमुळे शहरात दोन मुख्य चर्चा सुरू आहेत. एक म्हणजे, भारत जेतवानी आगामी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत का? आणि दुसरीकडे, आमदार हरीश पिंपळे यांचा यामागे काही ‘मास्टर प्लॅन’ आहे का?काही राजकीय विश्लेषकांच्या मते, भारत जेतवानी यांना भाजपसोबत घेऊन नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा आमदार पिंपळे यांचा विचार असू शकतो. तर काहींच्या मते, हा फक्त एक सदिच्छा भेट असल्याचा भाग आहे आणि त्याला कोणताही राजकीय अर्थ नाही. मात्र, आगामी काळात या दोन्ही नेत्यांच्या राजकीय भूमिका कशा असतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.हा फोटो केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छांपुरता मर्यादित आहे की आगामी राजकारणाची नांदी आहे, हे येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी मूर्तिजापूरच्या राजकीय वर्तुळात या एका फोटोने जोरदार खळबळ उडवून दिली आहे.
