
*मूर्तिजापूर* (प्रतिनिधी): येत्या काही दिवसांत येणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणामुळे सध्या बहिणींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आपल्या लाडक्या भावांना राख्या आणि भेटवस्तू पाठवण्यासाठी त्या पोस्ट ऑफिसमध्ये येत आहेत.मात्र, मूर्तिजापूर पोस्ट ऑफिसमध्ये राख्या आणि पार्सल पाठवण्यासाठी मोठी गर्दी होत असतानाच, नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

सर्व्हर डाऊन’चा बहाणा आणि तासनतास प्रतीक्षा:*
पोस्ट ऑफिसमधील काही कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराची तक्रार आधीपासूनच होती. आता त्यात आणखी एका समस्येची भर पडली आहे. अनेक नागरिक जेव्हा पार्सल किंवा राख्या पाठवण्यासाठी येतात, तेव्हा त्यांना वारंवार “सर्व्हर डाऊन आहे” असे सांगून तासनतास थांबवले जात आहे.
या बहाण्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सणासुदीच्या काळातही असे बेजबाबदार वर्तन होत असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महिलांना आणि नागरिकांना त्रास:
सणाच्या दिवसांत वेळेची किंमत सर्वांनाच असते. पण पोस्ट ऑफिसमधील या भोंगळ कारभारामुळे लोकांचा मौल्यवान वेळ वाया जात आहे. तांत्रिक समस्यांचे कारण देत ग्राहकांना थांबवून ठेवणे, हे एका प्रकारे त्यांच्या कामात दिरंगाई करण्याचे एक नवीन कारण बनले आहे, असे नागरिक बोलत आहेत.
या गंभीर बाबीकडे पोस्ट खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. यामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.