*साठ्यामधील तफावतीमुळे कृषी निविष्ठा केंद्रावर कारवाई

अमरावती, दि. 8 (जिमाका) : अनुदानित खत विक्री करण्यासाठी कृषि विभागाकडून विक्रेत्यांना आधुनिक ई-पॉसच्या 29 हजार यंत्रांचे वितरण करण्यात आले आहे. अद्यापही एक हजार विक्रेत्यांनी ही यंत्रे घेतलेली नाहीत. त्यांनी 10 ऑगस्टपूर्वी ई-पॉस मशिन बसवावे, अन्यथा दंडात्मक, परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.जिल्ह्यामध्ये किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई-पॉस यंत्राच्या माध्यमातून करणे बंधनकारक केले आहे. खत विक्रीच्या नोंदी तात्काळ आणि अचूक पद्धतीने समाविष्ट करण्यासाठी ई-पॉसमधील साठा आणि प्रत्यक्ष साठा समान असणे गरजेचे आहे. यासाठी विक्रीची नोंद आयएफएमएस प्रणालीमध्ये घेणे बंधनकारक आहे. नियमित तपासणी करण्यासाठी क्षेत्रियस्तरावरील तालुका खत निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत. खत विक्रेत्यांकडे ई-पॉसवरील खतसाठा व प्रत्यक्ष साठा यामध्ये फरक असल्यास खत विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये ई-पॉस मधील रासायनिक खतामध्ये तफावत आढळुन आलेल्या 6 कृषी निविष्ठा केंद्राच्या परवान्यावर निलंबन आणि 2 कृषी निविष्ठा केंद्राच्या परवान्यावर रद्दची कारवाई करण्यात आली आहे.जिल्ह्यामध्ये विक्रेत्यांनी एल 1 सिक्युरिटी हे नवीन यंत्र अद्यापही घेतलेले नाहीत, अशांनी जिल्ह्यातील कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क करून 10 ऑगस्टपूर्वी यंत्र सुरू करावेत, असे आवाहन कृषि उपसंचालक यांनी केले आहे.