
मूर्तिजापूर, (दिनांक ८ ऑगस्ट २०२५): येथील हातगाव ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या एका भ्रष्टाचाराच्या चौकशीदरम्यान फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हातगाव येथील रहिवासी शिवदास मधुकर राऊत (वय ४५) यांनी गावातील सरपंच व आरोपी अक्षय जितेंद्र राऊत (वय ३०) यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार गट विकास अधिकारी यांच्याकडे केली होती. याच तक्रारीची चौकशी आज दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असताना, आरोपी अक्षय राऊत याने फिर्यादी शिवदास राऊत यांना ‘माझ्याविरुद्ध तक्रार का केली’ असे विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.यावेळी आरोपीने शिवदास यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच, यापुढे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार शिवदास राऊत यांनी पोलिसांत केली आहे.या घटनेनंतर, मूर्तिजापूर शहर पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून अक्षय राऊत विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९६, ३५१(२), ३५२, ११५(२) आणि दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा २०१६ च्या कलम ९२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, लवकरच आरोपीला अटक करण्याची शक्यता आहे.