मूर्तिजापूर (अकोला): मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी काल रात्री गस्त घालत असताना, जनावरांची हाडे आणि इतर अवशेषांची अवैध वाहतूक करणारी एक बोलेरो पिकअप गाडी पकडली. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, एकूण ₹2,68,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही घटना सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. रात्रगस्त अधिकारी पो.हे.काॅ. गणेश गावंडे आणि त्यांचे सहकारी मूर्तिजापूर-लाखपुरी रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना, त्यांना रसूलपूर फाट्याजवळून एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप (क्र. MH 27.X.2731) भरधाव वेगाने जाताना दिसली. या गाडीतून तीव्र दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना संशय आला आणि त्यांनी लगेच गाडीचा पाठलाग सुरू केला.
पाठलाग करून पोलिसांनी गाडी थांबवली आणि चालकाची चौकशी केली. त्यावेळी चालक सैय्यद जावेद सैय्यद सादीक (वय ३१, रा. अंबोडा) आणि त्याचा साथीदार मोहम्मद आकीब मोहम्मद आरीफ (वय २९, रा. अकोट) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, त्यांच्याकडे गाडीत असलेल्या मालाची कोणतीही खरेदी पावती किंवा वाहतुकीचा परवाना नव्हता. गाडीची तपासणी केली असता, त्यात मृत जनावरांची हाडे, शिंगे आणि खुर मोठ्या प्रमाणात आढळून आली.
हा माल मानवी आरोग्यासाठी धोकादायक असून, त्यामुळे कोणताही संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्यता असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी, पोलिसांनी जप्त केलेल्या मालाची किंमत ₹68,000/- आणि बोलेरो पिकअपची किंमत ₹2,00,000/- असे मिळून एकूण ₹2,68,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 281 (बेकायदेशीरपणे वाहतूक), 271 (रोग पसरवू शकणाऱ्या वस्तूंची वाहतूक), 223 (b) (सार्वजनिक आरोग्यास धोका) आणि मोटर वाहन कायदा (मो.वा.का.) च्या कलम 184 (धोकादायक वाहन चालवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.का. प्रमोद नवलकार करत आहेत. ठाणेदार श्रीधर गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईमुळे परिसरात अशा प्रकारची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर जरब बसली आहे.
