
मूर्तिजापूर प्रतिनिधी –
मूर्तिजापूर शहर धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाने नटले, कारण शहराच्या इतिहासात प्रथमच खाटू श्याम बाबा यांची भव्य झांकी कावडवर विराजमान करण्यात आली. ही अविस्मरणीय कावड यात्रा राजे संभाजी शिवभक्त मंडळातर्फे लाखपुरी येथून प्रारंभ होऊन गजानन महाराज उद्यान मंदिर, लहरिया प्लॉट येथे मंगलमय वातावरणात संपन्न झाली.
यात्रेदरम्यान शिवभक्त व नागरिकांनी या अनोख्या श्याम झांकीचे मनापासून स्वागत केले. भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि ‘श्याम बाबा की जय’च्या घोषणांनी संपूर्ण मार्ग भक्तिमय झाला.
या अद्वितीय झांकीमागील कलेचा हात म्हणजे शिल्पकार सुनील नंदलाल भोजगढिया यांचे कौशल्य. तर झांकीचे देखणे श्रृंगार नितेश मनोज अग्रवाल (भूत) व पियुष दीपक भोजगढिया यांनी भावपूर्ण श्रध्देने साकारले.
शहरवासीयांसाठी ही कावड यात्रा केवळ धार्मिक सोहळा नव्हती, तर श्रद्धा, एकात्मता आणि संस्कृतीचा संगम होती. अनेकांनी असे नमूद केले की, ही झांकी पुढील अनेक वर्षे भक्तांच्या मनात कायमची कोरली जाईल.