

मूर्तिजापूर, (दि. १९ ऑगस्ट, २०२५): शहरातील नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि असुविधा लक्षात घेऊन मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी आज दुपारी साडेचार वाजता लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी रुग्णालयातील परिस्थिती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.
रुग्णालयातील धक्कादायक स्थिती
आमदार रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांना तेथे नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. मात्र, अनेक डॉक्टर आणि इतर महत्त्वाचे कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून गैरहजर असल्याचे समोर आले. हजेरी पत्रकाची तपासणी केली असता त्यातही अनियमितता आढळली. नागरिकांनी आपल्या व्यथा आमदारांसमोर मांडल्या. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली.
“अशी हलगर्जीपणा चालणार नाही!”
या परिस्थितीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार पिंपळे म्हणाले, “अकोला जिल्ह्यात हे रुग्णालय दुसऱ्या क्रमांकावर आहे, तरीही येथील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा एखाद्या मोठ्या अपघाताला किंवा गंभीर घटनेला आमंत्रण देऊ शकतो. रुग्णांच्या आरोग्याशी असा खेळ चालणार नाही.”
गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश
या गंभीर प्रकाराची दखल घेत, आमदार हरीश पिंपळे यांनी तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सक (CS) मॅडम यांना फोन करून गैरहजर असलेल्या सर्व दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यांनी विशेषतः, अशा कर्मचाऱ्यांचा १५ दिवसांचा पगार कापण्याची सूचना केली. “यामुळे त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळेल आणि भविष्यात असे गैरवर्तन पुन्हा होणार नाही,” असेही ते म्हणाले.
आमदारांच्या या अचानक भेटीमुळे रुग्णालयाच्या प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. आता प्रशासन यावर किती गंभीरपणे कारवाई करते आणि नागरिकांना न्याय मिळवून देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
