
मूर्तिजापूर: शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात अपयश आल्याने मूर्तिजापूर पोलीस ठाण्याचे डीबी (डिटेक्शन ब्रँच) पथक सध्या नागरिकांच्या टीकेचे लक्ष्य बनले आहे. या पथकावर गुन्हेगारांशी हातमिळवणी, अवैध धंद्यांना संरक्षण आणि वसुलीचे गंभीर आरोप होत असून, तातडीने या पथकात फेरबदल करण्याची मागणी जोर धरत आहे.
गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्याचा आरोप
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, डीबी पथकातील काही कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. पोलीस दलाच्या नियमांनुसार नियमित फेरबदल होणे अपेक्षित असतानाही हे कर्मचारी ठाण मांडून बसल्याने त्यांचा स्थानिक गुन्हेगारांवर प्रभाव वाढला आहे.
याचाच फायदा घेत अवैध धंदे, जसे की मटका, गुटखा, दारूविक्री, चोरी आणि दरोडे, मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आरोप असा आहे की, डीबी पथकातील काही कर्मचारी गुन्हेगारांशी संगनमत करून त्यांना संरक्षण देतात आणि त्यातून वसुली करतात. या गैरकृत्यांना स्थानिक राजकारण्यांचा पाठिंबा मिळत असल्याचा आरोपही नागरिक करत आहेत.
नागरिकांचा विश्वास डगमळला
या गंभीर आरोपांमुळे निष्पक्ष तपास होण्याची शक्यता कमी झाली असून, सामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास डगमळला आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. जर या परिस्थितीत तातडीने सुधारणा झाली नाही, तर मूर्तिजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला यांना विशेष सूत्राकडून माहितीच्या आधारे कि लेखी निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी आणि डीबी पथकात योग्य फेरबदल करावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे.