
अमरावती, दि. 20 (जिमाका): अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. यात त्यांनी विकासकामांची पाहणी केली. तसेच दौऱ्यात कुलंगणा खुर्द येथे वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाच्या कुटुंबियांना दहा लाखाचा धनादेश सुपूर्द केला. तसेच महावितरणच्या जरीदा उपकेंद्राला भेट दिली.
या पाहणी दौऱ्यात समितीचे प्रमुख दौलत दरोडा यांच्यासह समितीचे सदस्य केवलराम काळे, राजू तोडसाम, शांताराम मोरे, मंजुळा गावित, रामदास मसराम, उमा खापरे, राजेश राठोड, विनोद निकोले सहभागी झाले आहेत.
आजच्या पाहणी दौऱ्यात समिती सदस्यांनी सकाळी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांशी आरोग्य सुविधांबाबत चर्चा केली. त्यानंतर परतवाडा येथील मुलांचे वसतीगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी येथील सुविधांची पाहणी केली. कारंजा बहिरम येथील पंचशील आश्रमशाळेला भेट देऊन शाळेतील पायाभूत सुविधांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वन विभागाची परवानगी आवश्यक असलेल्या जरीदा येथील 33 केव्ही उपकेंद्राला भेट देऊन या ठिकाणी वृक्षारोपण केले. या उपकेंद्रामुळे परिसरातील 50 गावांचा विजेचा प्रश्न सुटणार आहे. यानंतर समितीने डोमा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली.
वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुलंगणा खुर्द येथील प्रविण सुखराम बेलसरे यांच्या कुटुंबीयांना समितीच्या सदस्यांनी भेट दिली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात प्रतिमुखी पडलेल्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीचे वाटप यावेळी करण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या प्रविण बेलसरे यांच्या कुटुंबीयांना दहा लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.