
अकोल्यातील उमा बॅरेज प्रकल्पातील कोट्यवधी रुपयांच्या महाघोटाळ्याची शक्यता व्यक्त होत असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अकोला सिंचन मंडळातील तत्कालीन चार वरिष्ठ अधिकारी व तीन कंत्राटदारांवर माना पोलीस ठाण्यात कलम 406, 409, 417, 420, 468, 471, 120(ब) भा.द.वि. 1860 अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गौरव प्रकाशराव बोबडे (सहाय्यक अभियंता, श्रेणी-1) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 01 मार्च 2011 ते 31 मार्च 2012 या कालावधीत उमा बॅरेज प्रकल्पातील सरळ उचल पद्धतीच्या द्वारनिर्मिती व उभारणीच्या कामात करारनाम्यानुसार अतिप्रदान करून शासनाला कोट्यवधींचे आर्थिक नुकसान पोहोचविण्यात आले असल्याचा गंभीर आरोप आहे.26 ऑगस्ट रोजी माना पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील महाघोटाळ्याची रक्कम ९ कोटींवर जाण्याची शक्यता असून, जिल्ह्यात चर्चेला ऊत आला आहे. प्रकरणाचा तपास अकोला आर्थिक गुन्हे शाखेकडे वळविण्यात आला असून, ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सखोल चौकशी सुरू आहे.या प्रकरणाने पाटबंधारे विभागातील भ्रष्टाचाराचे मोठे जाळे समोर आणले असून, आणखी कोण कोण सामील आहे, हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, लोकप्रतिनिधी गप्प का यावर चर्चा रंगली आहे.तालुक्यातील इतक्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराने प्रशासन हादरले असून, शासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.