
मूर्तिजापूर (अकोला): मूर्तिजापूर तालुक्यातील खराब ढोरे गावामध्ये अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे नागरिक आणि विशेषतः महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या समस्येमुळे युवक व्यसनाच्या आहारी जात आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या गंभीर परिस्थितीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग अपयशी ठरल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

अवैध दारू विक्री आणि विभागीत साटालोट्याचा संशय
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात अवैध दारूची विक्री बिनधास्तपणे सुरू असून याकडे उत्पादन शुल्क विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही, त्यामुळे या विभागातील काही अधिकारी आणि अवैध दारू विक्रेत्यांमध्ये साटालोटा असल्याचा संशय बळावला आहे. “हे अधिकारी केवळ नावापुरतेच आहेत का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

हे आहेत अवैध दारू विक्रेते
अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये अनिल मधुकर थोप (रा. खराब डोरे), रवींद्र प्रभाकर थोप (रा. खराब डोरे), आणि मिलिंद जानराव आटोटे (रा. समशेरपूर) यांचा समावेश असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या लोकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. *महिला आणि युवकांचे भविष्य धोक्यात* अवैध दारूच्या सुलभ उपलब्धतेमुळे गावातील युवा पिढी व्यसनाच्या गर्तेत अडकत आहे. त्यामुळे कुटुंबातील शांतता भंग पावत असून, महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीमुळे महिलांनी वारंवार पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी केल्या आहेत, मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत आहे. *नागरिकांचे निवेदन आणि प्रशासनाला आवाहन* या गंभीर समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी खराब डोरे गावातील जागरूक नागरिकांनी नुकतेच मूर्तीझापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. या निवेदनात नागरिकांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रिय भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशासनाने या गंभीर विषयाची दखल घेऊन तातडीने कठोर पावले उचलावीत, अन्यथा नागरिक आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला आहे
पोलिसांची सकारात्मक भूमिका
या संदर्भात मूर्तिजापूर ग्रामीणचे ठाणेदार श्रीधर गुट्टे साहेब यांनी एक सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांनी खराब डोरे गावातील अवैध दारू विक्रीवर मोठी कारवाई केली असून, पुढेही अशा कारवाया सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
