
अकोला: शहरातील MIDC भागातील व्यावसायिक सुफीयान खान यांच्या हत्या प्रकरणी, अकोला पोलिसांनी अवघ्या १२ तासांत सर्व आरोपींना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी यशस्वी केली. *नेमकं काय घडलं?* १ सप्टेंबर २०२५ रोजी फिर्यादी शेहरे आलम समीरउल्ला खान यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास त्यांचा मालक सुफीयान खान, साजीद खान आणि मोहम्मद कैफ यांच्यासह मलकापूर रेल्वे लाईन बोगद्याजवळ गाडीत होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. ‘तुम्ही येथे मुलींना घेऊन आला आहात का?’ असे म्हणत आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींपैकी एकाने त्याच्या साथीदाराला ‘चाकूने मार’ असे सांगितले. त्यानंतर एका आरोपीने सुफीयान खान यांच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने सपासप वार केले. यात सुफीयान गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले साजीद खान हेदेखील गंभीर जखमी आहेत.पोलिसांची तात्काळ कारवाईघटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. घटनेचे ठिकाण निर्जन असल्याने आणि सीसीटीव्ही कॅमेरे नसतानाही, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला.पोलिसांनी वाशिम बायपास येथून सुरुवातीला तीन आरोपींना ताब्यात घेतले:१. फैजान खान मुर्शरफ खान२. अब्दुल अरबाज अब्दुल इस्माईल३. शोएब अली उर्फ राजा तैयब अलीया आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, एक पथक बुलढाणा जिल्ह्यात रवाना झाले. शेगाव येथून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. यामध्ये:१. शेख अस्लम शेख अकबर२. सैय्यद शहबाज उर्फ सोनू सैय्यद मुजीब३. एक अल्पवयीन बालक यांचा समावेश आहे.सर्व आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.हल्ल्यामागे गैरसमजपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे साथीदार निर्जनस्थळी सिगारेट पीत होते. त्यावेळी आरोपींना त्यांच्यासोबत मुलगी असल्याचा गैरसमज झाला. याच गैरसमजातून त्यांच्यात वाद होऊन मारामारी झाली, ज्यात ही दुर्दैवी घटना घडली.सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.