-विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

अमरावती, दि. 9 (जिमाका) : प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षकांमुळे घडतो. शिक्षकांच्या वर्तनाचा विद्यार्थ्यांवर खोलवर परिणाम पडतो. त्यामुळे शिक्षकांनी सर्वोत्तम आदर्श आचरण ठेवावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केले.जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मिलींद कुबडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिश मुगल, डायटचे अधिव्याख्याता प्रविण राठोड आदी उपस्थित होते.डॉ. सिंघल यांनी शिक्षकांना पिढी घडविण्याची संधी दिली आहे. त्यामुळे शिक्षकांनी त्यांच्या कामावर लक्ष्य केंद्रीत करून शिक्षण देण्याचा आनंद घ्यावा. शाळेचा आत्मा हा शिक्षक आहे. नवीन पिढी घडविण्याचे काम शिक्षकामुळे होत आहे. त्यामुळे शिक्षकांना मिळालेल्या या संधीचे सोने करावे. तसेच विद्यार्थ्यांना अभिमान वाटेल, अशी वागणूक ठेवावी. इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी जिल्हा परिषद शाळांची स्पर्धा असल्याने शाळांनी इंग्रजीवर भर द्यावा. यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावे, तसेच डिजीटल शाळांचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले.श्रीमती महापात्र यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. शिक्षकांनी येत्या काळात चांगले कार्य करून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन केले. यावेळी डॉ. कुबडे यांनी मार्गदर्शन केले. श्री. मुगल यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार प्राप्त शिक्षक गजानन काकडे, वनिता बोरोडे, श्री. विरेंद्र यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2, जिल्हास्तरीय पुरस्कार, शिष्यवृत्ती परिक्षा, निपून महाराष्ट्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अंकुश गावंडे आणि विद्यार्थ्यांनी अलेक्साचे प्रात्यक्षिक सादर केले.