
अकोला: ऑपरेशन प्रहार अंतर्गत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बोरगाव मंजू पोलिसांनी कसाबपुरा येथे छापा टाकून कत्तलीसाठी तयार ठेवलेले दोन बैल आणि १५० किलो गोमांस जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.९ सप्टेंबर २०२५ रोजी बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गोपाळ यांना कसाबपुरा येथील अब्दुल रहीम शेख छन्नु (वय ४२) आणि मोहम्मद शोएब अब्दुल शहीद (वय २४) यांच्या घरात गोवंश असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला.छाप्यादरम्यान, पोलिसांना ३०,००० रुपये किमतीचा एक पांढरा बैल आणि ३५,००० रुपये किमतीचा एक तपकिरी बैल असे एकूण ६५,००० रुपये किमतीचे दोन बैल कत्तलीसाठी बांधलेले आढळले. याव्यतिरिक्त, ८ पांढऱ्या पोत्यांमध्ये ३०,००० रुपये किमतीचे १५० किलो गोमांस, दोन सुऱ्या आणि एक कुऱ्हाड असा एकूण ९५,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी उपनिरीक्षक रवींद्र धुळे यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हा (अ.नं. २९३/२०२५) दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. बी.सी. रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ, उपनिरीक्षक रवींद्र धुळे, मनोज उघडे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.