
कारंजा: राज्याच्या जनसुरक्षा विधेयकामुळे जनतेचे अधिकार धोक्यात आले असून, या विधेयकाला विरोध करण्यासाठी समाज क्रांती आघाडीने (सक्राआ) एल्गार पुकारला आहे. हे विधेयक मंजूर होऊन त्याचे कायद्यात रूपांतर झाल्यास नागरिकांचा आत्मसन्मान आणि त्यांचे हक्क हिरावले जातील, अशी भीती सक्राआचे अध्यक्ष हंसराज शेंडे यांनी व्यक्त केली.कारंजा येथे झालेल्या पक्षाच्या चिंतन सभेत ते बोलत होते. शेंडे म्हणाले की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९ नुसार प्रत्येक नागरिकाला शासनाच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्याचा अधिकार आहे. मात्र, जनसुरक्षा विधेयक हा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हे विधेयक हाणून पाडण्यासाठी तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल.समाजातील वाढती अस्वस्थता:सध्या समाजात वाढलेल्या अस्वस्थतेवर शेंडे यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “आज नोकऱ्या नाहीत, तरी आरक्षणाचे आंदोलन सुरू आहे. ग्रामीण शिक्षणाची दुरवस्था झाली आहे. शेतकरी नैसर्गिक आणि सरकारी संकटांमुळे हवालदिल झाला आहे, तर शेतमजुरांच्या हाताला काम नाही.” उपमुख्यमंत्र्यांकडून एका आयपीएस अधिकाऱ्याचा अपमान होतो, ही बाब कायद्याच्या राज्यासाठी निंदनीय आहे, असेही त्यांनी नमूद केले. जनतेला केवळ सरकारच्या मर्जीवर अवलंबून राहावे लागत आहे, हे संविधानविरोधी आहे, असेही ते म्हणाले.एकत्र येण्याचे आवाहन:या लढ्यात सर्व तरुणांनी राजकारण बाजूला ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहन शेंडे यांनी केले. चिंतन सभेला मुंबईहून बी. जी. पाटील, अकोल्यावरून शिलवंत वानखडे यांच्यासह नागपूर, नाशिक, अमरावती, बुलढाणा, वाशिम, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, मूर्तिजापूर, दर्यापूर आणि मानोरा येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.जातीभेद सोडून लढ्यात सहभागी व्हा:यावेळी डॉ. गोपाल उपाध्ये, गुलाबसिंग राठोड आणि केशवराव वानखडे यांनीही आपले विचार मांडले. डॉ. गोपाल उपाध्ये यांनी बहुजन समाजाने जात, धर्म सोडून एकत्रितपणे आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन केले.गुलाबसिंग राठोड यांनी बंजारा समाजाने केवळ धार्मिक विचारांमध्ये न गुरफटता सामाजिक आणि बौद्धिक आंदोलनात सहभागी व्हावे असे सांगितले. ते म्हणाले, “बंजारा तरुण बेरोजगार झाला आहे आणि तांड्यातील लोक सांस्कृतिक मूल्यांच्या नावाखाली विज्ञान आणि विचारधारेपासून दूर जात आहेत.” बंजारा समाज कष्टाळू आणि लढवय्या असूनही सामाजिक आंदोलनात सक्रिय नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.केशवराव वानखडे यांनी संघटनेत नवीन लोकांना जोडून घेण्यावर भर देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे नियोजन गुलाबसिंग राठोड यांनी केले, तर अशोक वरघट यांनी प्रास्ताविक केले आणि सुदाम शेंडे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम गौतम नगरातील देशमुखे यांच्या गुरुदेव कार्यालयात पार पडला. सदर माहिती समाज क्रांती आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडूदादा वानखडे यांनी दिली.