
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करत अँटी करप्शन विभागाने (एसीबी) मोताळा येथील तहसीलदार हेमंत पाटील यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी अकोला एसीबीच्या पथकाने बुलढाणा येथील त्यांच्या निवासस्थानी केली.एका तक्रारदार शेतकऱ्याच्या वर्ग २ मधील जमिनीचे वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासाठी तहसीलदार पाटील यांनी तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने तात्काळ अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, बुलढाणा शहरातील तहसीलदारांच्या घरी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.या कारवाईमुळे तहसीलदार कार्यालयातील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रकाश पडला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या कामासाठी पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे. एसीबीच्या या धाडसी कारवाईमुळे प्रशासनातील भ्रष्टाचाराचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून, प्रामाणिक शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळाला आहे.