मुर्तीजापूर तहसील कार्यालयातील सेतू केंद्रांची मनमानी: नागरिकांची लूट, भ्रष्टाचाराचा संशय

0
37

मुर्तीजापूर तहसील कार्यालयाच्या आवारात सरकारी जागेवर उनखेड येथील सेतू केंद्र सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियमांनुसार, सेतू केंद्र ज्या गावात मंजूर झाले आहे, ते त्याच गावात चालवणे बंधनकारक आहे. मात्र, काही सेतू केंद्र चालक हे नियम धाब्यावर बसवून शहरात, विशेषतः तहसील कार्यालयाच्या परिसरात आपले केंद्र चालवत आहेत. यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत असून, त्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

*भ्रष्टाचाराची साखळी उघड*

या प्रकरणात फक्त नियमांचे उल्लंघन होत नसून, एका मोठ्या भ्रष्टाचाराची साखळी उघडकीस आली आहे. सूत्रांनुसार, तहसील कार्यालयातील काही संबंधित अधिकारी आणि सेतू केंद्र चालकांमध्ये व्हाट्सॲपद्वारे पैशांची देवाण-घेवाण सुरू आहे. नागरिकांकडून अतिरिक्त पैसे घेतल्यास काम लवकरात लवकर होईल आणि कागदपत्रे कमी असल्यास ती “मॅनेज” केली जातील, असे प्रकार सर्रास सुरू आहेत. यामुळे प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.

*प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नागरिकांचा रोष.*

हे सेतू केंद्र तहसील कार्यालयाच्या अगदी जवळ चालत असतानाही प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. तहसीलदार मॅडम यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांचा आरोप आहे की, गावातील सेतू शहरात आणून नागरिकांची सर्रास लूट केली जात आहे आणि यावर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे. ही बातमी समोर आल्यावर नागरिकांनी तहसीलदार, कर्मचारी आणि सेतू केंद्रांचा तीव्र विरोध केला आहे.

या प्रकरणात प्रशासकीय अधिकारी काय पाऊल उचलतात आणि या अवैध सेतू केंद्रांवर कारवाई होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here