
दर्यापूर प्रतिनिधी अमोल चव्हाण,अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः चांदूरबाजार आणि अचलपूर भागातील खरीप पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संजय खोडके यांनी स्वतः हिरूळपूर्णा, आंसेगाव पूर्णा आणि कारंजा बहिरम या भागातील शेतांना भेटी देऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.या पाहणीदरम्यान, कापूस, सोयाबीन आणि संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावनांनुसार, तयार झालेली पिके डोळ्यादेखत नष्ट झाल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.आमदार खोडके यांनी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर कृषी मंत्र्यांशीही दूरध्वनीवरून चर्चा केली. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पर्जन्यमापक केंद्र नसल्यामुळे नेमका किती पाऊस झाला याची नोंद उपलब्ध नाही. त्यामुळे, नुकसानीचे मूल्यांकन करणे कठीण होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिले आहे. या पत्रात, त्यांनी नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली आहे.आमदार खोडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे की त्यांनी शासनाकडून तत्काळ पंचनाम्यासाठी आदेश मिळवावेत आणि तलाठी व कृषी अधिकाऱ्यांमार्फत तातडीने नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याची कार्यवाही करावी. यामुळे बाधित शेतकऱ्यांना लवकर मदत मिळू शकेल.