
मूर्तिजापूर: महसूल प्रशासनाला अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख बनवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियाना’अंतर्गत ‘महसूल पंधरवाडा’ साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून, मूर्तिजापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना महसुली कागदपत्रांची माहिती मिळावी आणि भविष्यात होणारी फसवणूक टाळता यावी यासाठी ‘सातबारा वाचन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमांतर्गत, दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी श्री. गाडगे महाराज महाविद्यालय, मूर्तिजापूर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक विशेष कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर, श्री. संदीपकुमार अपार यांनी विद्यार्थ्यांना सातबारा उताऱ्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी गाव नमुना सातबारा या अधिकार अभिलेखाबद्दल सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.श्री. अपार यांनी महसूल अभिलेखांमधील पारदर्शकता आणि अचूकतेवर भर दिला. तसेच, ई-पीक पाहणीचे महत्त्व स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांना हे काम पूर्ण करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला श्री. गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संतोष ठाकरे, परिविक्षाधीन तहसीलदार कु. गिरीजादेवी लोखंडे आणि प्राध्यापिका डॉ. मनीषा यादव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या उपक्रमाला मंडळ अधिकारी श्री. रविंद्र पुरी, महसूल सेवक श्रीकांत डांगे आणि महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. महाविद्यालय व्यवस्थापन आणि प्राध्यापकांनी या कार्यक्रमासाठी सक्रिय सहकार्य केले. महसूल विभागाच्या या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महसूल कागदपत्रांविषयी जागरूकता निर्माण होईल आणि एक जबाबदार महसूल प्रशासन घडवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.