कमिशनखोरी’च्या चर्चेने मूर्तिजापूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी चुरस! २५ ते ३० ‘बलाढ्य’ उमेदवारांची शक्यता

0
7

मूर्तिजापूर: शहरात सध्या नगरपालिका प्रशासनाविषयी जनसामान्यांमध्ये तीव्र चर्चा आहे. मूर्तिजापूर नगरपालिका ही जिल्ह्यातील ‘कमिशनखोर’ संस्था असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. याच कारणामुळे, आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी या मतदार संघात मोठी चुरस निर्माण होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. निवडणुकीच्या रिंगणात तब्बल २५ ते ३० ‘बलाढ्य’ उमेदवार उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे, ज्यामुळे ही निवडणूक अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे.एकिकडे मूर्तिजापूर शहर ‘सिमेंट रस्त्यांचे शहर’ म्हणून ओळखले जात असले तरी, दुसरीकडे येथील नागरिकांना मूलभूत सुविधांची मोठी कमतरता भासत आहे. विशेषतः पाणीपुरवठ्याचा प्रश्न आजही जटिल बनलेला आहे. नागरिकांना आठवड्यातून केवळ एकदाच पाणी मिळते आणि तेही नेमक्या वेळेवर मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे स्थानिकांमध्ये पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.शहरात विकास कामांची चर्चा असली तरी, नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण न झाल्याने त्यांच्या मनात विकासाबाबतचा रोष स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याचवेळी, पालिकेतील ‘आर्थिक आकर्षणाच्या’ आणि ‘कमिशनखोरी’च्या कथित राजकारणामुळे नागरिकांमध्ये एकाच वेळी तीव्र उदासीनताही दिसून येत आहे.विशेष म्हणजे, या ‘कमिशनखोर’ असल्याच्या चर्चेमुळेच अनेक ‘बलाढ्य’ आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. निवडणुकीत मोठ्या संख्येने उमेदवारांची गर्दी झाल्यास मतदारांचे विभाजन होऊन अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, ‘विकासाचा रोष’ आणि ‘आर्थिक आकर्षणाची चुरस’ या दुहेरी वातावरणात मूर्तिजापूरची नगराध्यक्ष निवडणूक कशी रंगणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here