
मूर्तीजापूर : अकोला जिल्ह्यातील राजकारणात सध्या मूर्तीजापूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, नगराध्यक्ष पदासाठी जाहीर झालेले ‘सर्वसाधारण’ (Open) आरक्षण!

जिल्ह्याचे लक्ष मूर्तीजापूरकडे:अकोला जिल्ह्यातील एकमेव मूर्तीजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या निवडणुकीकडे लागले आहे. हे आरक्षण जाहीर होताच शहराच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क आणि चर्चांना उधाण आले आहे. सर्वसाधारण आरक्षणामुळे कोणत्याही गटातील सक्षम उमेदवाराला संधी मिळू शकते, या आशेने अनेक ‘भावी’ नगराध्यक्षांना आतापासूनच नगराध्यक्ष पदाचे ‘डोहाळे’ लागले आहेत.

मोठमोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला:या आरक्षणामुळे अनेक मातब्बर राजकीय नेत्यांनी मूर्तीजापूर शहराकडे विशेष लक्ष दिले आहे. आपल्या समर्थकाला किंवा स्वतःच्याच पक्षाला नगराध्यक्ष पदावर विराजमान करण्यासाठी मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शहरात गुप्त बैठका, गाठीभेटी आणि रणनीती आखण्याचे काम जोरात सुरू झाले आहे. अनेक जण आपल्या राजकीय गुरुंना भेटून आशीर्वाद घेत आहेत, तर काही जण थेट मतदारांच्या भेटीगाठींवर लक्ष केंद्रित करत आहेत. *जनता कोणाला देणार संधी?* एकीकडे इच्छुकांना डोहाळे लागले असले, तरी दुसरीकडे शहरातील नागरिक आणि मतदार राजा शांतपणे या साऱ्या घडामोडी पाहत आहे. मूर्तीजापूरची जनता यावेळी खरंच कोणत्या पक्षाला किंवा व्यक्तीला संधी देणार? जुन्या नेतृत्वाला कायम ठेवणार की, नवीन आणि तरुण नेतृत्वाला निवडणार? शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन येणाऱ्या उमेदवारालाच मतदार पसंती देतील, यात शंका नाही.

मूर्तीजापूर नगरपरिषदेची ही निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचारात खरी रंगत येणार आहे, पण सध्या तरी ‘सर्वसाधारण’ आरक्षणामुळे लागलेले हे ‘डोहाळे’ आणि नागरिकांचा कौल कोणाच्या बाजूने असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!










