
अमरावती चांदुर रेल्वे प्रतिनिधी सुनील वानखडे : दिवाळीच्या रात्री राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या ‘हिट अँड रन’ (Hit and Run) प्रकरणातील मुख्य आरोपीला अखेर राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गझल बिअर बारजवळ घडली होती, जिथे दुचाकीवरून काली माता मंदिराचे दर्शन करून परतणाऱ्या दोन युवतींच्या वाहनाला कारने जोरदार धडक दिली होती, यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी, कार चालक रोहित नंदगवली (२७), रा. लुम्बिनी नगर, फ्रेजरपुरा, याला अटक करण्यात आली आहे. कारच्या धडकेमुळे वैष्णवी थोरात ही युवती गंभीररित्या जखमी झाली होती.पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि डीसीपी घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली, राजापेठचे ठाणेदार पुनीत कूलट यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या पथकामध्ये पीएसआय हिवरे, एचसी मनीष करपे, रवी लिखितकर, पंकज खटे, सागर भजगौरे आणि अर्जुन कदम यांचा समावेश होता.पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात तीव्र संताप होता, त्यामुळे आरोपीच्या अटकेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. राजापेठ पोलिसांनी केलेल्या तत्काळ आणि तांत्रिक तपासाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.






