
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :- नरेश राऊत प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग विभागातील मुख्य शल्यक्रिया गृहाचे नूतनीकरण करण्यात आले असून, तेराव्या वित्त आयोगांतर्गत उभारलेल्या विशेष नवजात शिशु अतिदक्षता कक्षाचे (SNCU) उद्घाटन केले. या नव्या आणि सुधारित सुविधांमुळे मातृत्व व बालआरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता, कार्यक्षमता आणि सुरक्षेत लक्षणीय वाढ होणार आहे.तसेच, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक सिटीस्कॅन यंत्राचे, श्रेणीवर्धित रुग्णकक्ष विभागाचे (११३ खाटांची सुविधा असलेला विभाग), शल्यक्रिया अतिदक्षता विभागाचे (Surgical ICU) आणि श्वसन अतिदक्षता विभागाचे (Respiratory ICU) लोकार्पण केले. या सर्व सुविधा रुग्णालयाच्या अधोसंरचनेत सुधारणा व विस्तार करून उभारण्यात आल्या आहेत.विविध विभागांना भेट देऊन तेथील अद्ययावत सुविधा, उपकरणे आणि रुग्णसेवा व्यवस्था यांची पाहणी केली.या सुधारित आणि आधुनिक सुविधांमुळे यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि अद्ययावत आरोग्यसेवा मिळणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांनाही याचा थेट लाभ होईल.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे जिल्ह्याच्या आरोग्यसेवेचे मुख्य केंद्र असून, नव्या अद्ययावत सुविधांमुळे वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवा या तिन्ही क्षेत्रांत अधिक बळकटी मिळणार आहे.यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा, उपअधिष्ठाता डॉ. पाशू शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, स्त्रीरोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. शमा केदार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद कुडमेथे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. दुर्गेश देशमुख, प्रशासकीय अधिकारी संतोष झिंजे तसेच महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








