अकोल्याची अंकिता कांगटे छत्रपती करंडकची विजेतीराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात ; विवेकी व निर्भीड विचारांचा जागर

0
9

मुर्तीजापुर प्रतिनिधी स्वप्निल जामनिक : ‘जय जवान, जय किसान’ या अमर घोषणेच्या ६० व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेली छत्रपती करंडक राज्यस्तरीय खुली–आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २०२५ रविवार, दि. ७ डिसेंबर रोजी श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे मोठ्या उत्साहात पार पडली. राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या स्पर्धकांनी सामाजिक, राष्ट्रीय आणि वैचारिक विषयांवर प्रभावी, अभ्यासपूर्ण व निर्भीड मांडणी करत उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकले. युवकांमध्ये विचारस्वातंत्र्य, नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि मुक्त अभिव्यक्ती रुजावी या हेतूने दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.या स्पर्धेत खुला–महाविद्यालयीन गट आणि १५ वर्षांखालील (शालेय) गट अशा दोन विभागांमध्ये वक्तृत्वाची चुरस पाहायला मिळाली. विशेष म्हणजे दोन्ही गटांत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धक मुली ठरल्या, ही बाब उपस्थितांसाठी विशेष अभिमानास्पद ठरली. खुला–महाविद्यालयीन गटात अंकिता कांगटे (अकोला) हिने अत्यंत प्रभावी, मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण भाषण सादर करत मानाचा छत्रपती करंडक पटकावला. तिच्या सशक्त मांडणीला परीक्षकांसह प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. विजेतेपदासह तिला मानाचा फेटा व खलिता, सन्मानचिन्ह, पुस्तके तसेच ११,१११ रुपये रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. या गटात यश पाटील (मुंबई) याने प्रथम क्रमांक, मिथुन माने (सातारा) याने द्वितीय तर वैष्णवी पागृत (अकोला) हिने तृतीय क्रमांक पटकावला. गोविंद भांड (पुणे) याला चतुर्थ तर मयुरी वाहाणे (अकोला) हिला पंचम क्रमांक मिळाला. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके परमेश्वर झाडे (वाशीम), श्रावणी रोटे (अमरावती), विठ्ठल कांगणे (चिखली), दत्तहरी जाधव (नांदेड) आणि प्रसाद जांभूळकर (वर्धा) यांना देण्यात आली. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे होते, तर उद्घाटन मा. मोहम्मद अजीज यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून शफिक अहमद, शिवाजीराव म्हैसणे, शेख गुरुजी आणि प्रा. मधु जाधव यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. खुला–महाविद्यालयीन गटासाठी दिनेश गाडगे, डॉ. मेघराज गाडगे, प्रा. डॉ. स्वप्निल इंगोले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, तर १५ वर्षांखालील गटासाठी प्रा. डॉ. निलेश पाकदुने, ॲड. सचिन माहोकार आणि प्रा. मोनिका शिरसाट यांनी अत्यंत चोख आणि न्याय्य परीक्षण केले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन मयूर वानखडे, प्रास्ताविक प्रांजली देशमुख, तर आभार प्रदर्शन प्रतीक दुतोंडे यांनी केले. दिवसभराच्या स्पर्धेचे सूत्रसंचालन नेहा तायडे यांनी केले. बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन साक्षी पवार, तर विजेत्यांची घोषणा अक्षय राऊत यांनी केली.————————–शालेय गटानेही मंच गाजवला १५ वर्षांखालील गटातील वक्त्यांनीही आपल्या वयाच्या पलीकडील परिपक्वता, तार्किकता आणि अभ्यासपूर्ण मांडणी करत मंच गाजवला. या गटात संचिता आष्टेकर (नांदेड) हिने प्रथम क्रमांक मिळवला. अमित चक्रनारायण याने द्वितीय, स्मित भोयर याने तृतीय, भक्ती वाघ हिने चतुर्थ तर श्लोक लव्हाळे याने पंचम क्रमांक पटकावला. या गटातील उत्तेजनार्थ पुरस्कार स्नेहा वैराळे, आतिका तमकीन, आनंदी मोडक, ईशान्वी खंडारे आणि श्रीयोग पाचपोर यांना प्रदान करण्यात आले. लहान वयातच सामाजिक प्रश्नांवर निर्भीडपणे व्यक्त होणारी ही पिढी भविष्यासाठी आशादायक असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.————————करंडकाचे वैशिष्ट्य ठरले आकर्षणस्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे १२ किलो वजनाचा तांब्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोरलेला भव्य करंडक. यावर्षी ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेला समर्पित हाताने कोरीव काम करून तयार केलेली सन्मानचिन्हे हेही वैशिष्ट्य ठरले. छत्रपती करंडकाचे मंचावर आगमन शिवगर्जनेच्या गजरात आणि जल्लोषात करण्यात आले, ज्यामुळे वातावरण भारावून गेले.——————————संविधानवादी विचारांचा पुरस्कारबक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रफुल गुडदे होते. मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “संविधानाच्या मार्गावर चालणाऱ्या नवीन पिढीने आपल्या विवेकी आणि निर्भीड आवाजातून छत्रपतींच्या स्वराज्याच्या स्वप्नाची दिशा दाखवून दिली आहे.” त्यांनी आयोजन समितीतील सर्व तरुणांचे कौतुक केले आणि विजेत्यांचे अभिनंदन करत पुढील पिढी विचारशील, निर्भीड व जबाबदार नागरिक म्हणून घडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रमुख अतिथी म्हणून विजय सरटकर, माजी सैनिक देविदास काजगे (जय जवान जय किसान माजी सैनिक संघटना) आणि रामेश्वर बरगट उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here