
भद्रावती तालुका प्रतिनिधी / सुनिल दैदावार भद्रावती – : कारगिल युद्धात रणांगणावर माणुसकी जपणारे, ९७ अधिकारी व जवानांचे प्राण वाचवणारे सेना पदक विजेते कर्नल डॉ. राजेश डब्ल्यू. अधाऊ यांनी अलीकडे ताडोबा पर्यटन स्थळास आपल्या परिवारासह भेट दिल्यानंतर भद्रावती शहरात सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या भेटीचे औचित्य साधून भद्रावतीतील मान्यवरांनी त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याचा भव्य सत्कार केला. १९९९ च्या कारगिल युद्धात कर्नल डॉ. अधाऊ हे १३ जेकें रायफल्सचे रेजिमेंटल मेडिकल ऑफिसर (RMO) म्हणून कार्यरत होते. प्रचंड उंची, शून्याच्या खाली तापमान, ऑक्सिजनचा अभाव आणि शत्रूचा सतत गोळीबार अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी युद्धाच्या पुढील रेषेपासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर राहून जखमी जवानांवर तात्काळ वैद्यकीय उपचार केले. ‘सुवर्ण तासात’ दिले जीवनदान युद्धातील जखमी सैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ‘सुवर्ण तासात’ कर्नल अधाऊ व त्यांचे सहकारी उपनिरीक्षक शिवराज चौहान यांनी अहोरात्र कार्य करत सुमारे ९७ जखमी अधिकारी व जवानांचे प्राण वाचवले. रक्तस्राव रोखणे, श्वसन स्थिर करणे, तातडीचे प्रथमोपचार व मनोबल वाढवणे, अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली. भद्रावतीत सन्मान व गौरव भद्रावती येथे त्यांच्या या अतुलनीय सेवेमुळे डॉ. प्रेमचंद, डॉ. माला प्रेमचंद, सामाजिक कार्यकर्ते राजू गुंडावार, ॲड. मिलिंद रायपूरे, डॉ. राकेश तिवारी, संजय गुंडावार आदी मान्यवरांच्या हस्ते कर्नल डॉ. अधाऊ यांचा शाल, पुष्पगुच्छ व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.








