
पालघर : पुण्याच्या मावळ तालुक्यातील राखीव वनक्षेत्रात बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या तक्रारीनंतर लक्षवेधीला उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्कालीन तहसीलदार आणि पालघरचे विद्यमान उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांना जबाबदार धरत त्यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा केली. सार्वजनिक मालमत्तेवर अशाप्रकारे ९० हजार ब्रास मातीची बेकायदेशीररीत्या उत्खनन करणे म्हणजे एक प्रकारचा बलात्कार असल्याची टीका बावनकुळे यांनी यावेळी केली.आ. शेळके यांनी आपल्या मतदारसंघात राखीव वनक्षेत्रात हजारो ब्रास मातीचे उत्खनन केल्याची तक्रार लक्षवेधीच्या माध्यमातून मांडली होती. त्या लक्षवेधीला उत्तर देताना महसूलमंत्री म्हणाले, संबंधित अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी चुकीची परवानगी दिली असून, त्याबाबत चौकशी होणे आवश्यक होते. चौकशी विभागीय आयुक्तांमार्फत होणे गरजेचे असून, आमदाराकडे त्याव्यतिरिक्त अजून काही गट असल्यास ते माझ्याकडे द्यावेत, असे महसूल मंत्र्यांनी सांगून एकत्रित चौकशीचे आश्वासन दिले होते. आ. शेळके यांनी या प्रकरणाचा आठ महिने पाठपुरावा केल्यावर वेगवेगळी कारणे देऊन वेळ मारून नेल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. महसूल मंत्र्यांनी उत्खननाला जबाबदार धरत रणजीत देसाई यांच्यासह २ तलाठी, ४ मंडळ अधिकारी, ४ तहसीलदार यांसह काही अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा केली.डहाणूतील जमीन गैरव्यवहार; तलाठी, मंडल अधिकारी निलंबित पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातीलबाडापोखरण येथील जमीन दुसऱ्या व्यक्तीच्या नावे केल्याप्रकरणी तलाठी संतोष कोटनाके व मंडल अधिकारी जोस्वीन जमजा यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी विधानसभेत केली.तलाठी आणि मंडल अधिकाऱ्याने संगनमत करून, कागदपत्रांची तपासणी न करताच जानकीबाई भंडारी यांची जमीन राजेंद्र राऊत यांच्या नावे केल्याप्रकरणी भास्कर जाधव यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. या फसवणुकीप्रकरणी राजेंद्र राऊतसह सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचाही पोलिस तपास करीत आहेत.जमीन ४ गुंठे असताना ४० गुंठे असल्याचे दाखवून गैरव्यवहार केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा प्रकार कसा घडला याचा तपास केला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. तलाठी, मंडलाधिकारी यांना निवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने नियुक्त करून एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावर करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत.निवृत्त अधिकारी असे काम करीत असतील तर त्याची माहिती घेऊन त्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी आमदार योगेश सागर यांनी केली. यावर याचा तपास करून एकही निवृत्त अधिकारी या कामावर राहणार नाही, याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.






