
मुर्तिजापूर :अकोला जिल्ह्यातील पाच पत्रकारांना आमदार अमोल मिटकरी यांच्या विशेषाधिकार हनन प्रकरणी विधान परिषदेने ५ दिवसांची कोठडीची शिक्षा ठोठावल्याबद्दल मुर्तिजापूर (जि. अकोला) तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांनी आज (दिनांक १५डिसेंबर २०२५) तीव्र संताप व्यक्त करत, उपविभागीय अधिकारी कार्यालय, मुर्तिजापूर येथे माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने निवेदन सादर केले. ही कारवाई म्हणजे ‘बेफाम राजकीय हुकूमशाहीचा’ उदय करण्याचा प्रयत्न असून, पत्रकारांना त्वरित न्याय न मिळाल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.घटनेचे स्वरूप आणि तीव्र निषेधउपरोक्त निवेदनात नमूद केल्यानुसार, विधान परिषदेचे आमदार श्री अमोल मिटकरी यांच्या विशेषाधिकार हनन प्रकरणी एका बातमी संदर्भात केलेल्या तक्रारीनुसार विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये विधानपरिषदेच्या सभागृहात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यामध्ये अकोल्याच्या सौ. हर्षदा गणेश सोनवणे (महिला पत्रकार) तसेच सतिष देशमुख (संपादक, दे. सत्यलढा), गणेश सोनवणे, अमोल नांदुरकर व अंकुश गावडे या पाच पत्रकारांना ५ दिवसांची कोठडीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.मुर्तिजापूर येथील पत्रकार बांधवांनी या कृतीचा जाहीर निषेध करताना म्हटले आहे की, सदर बाब अत्यंत निषेधार्ह असून, या माध्यमातून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या अस्तित्वावर थेट घाला घालण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश लावण्याचा प्रयत्ननिवेदनात पुढे म्हटले आहे की, “पत्रकारीतेवर अंकुश निर्माण करून बेफाम राजकीय हुकूमशाहीचा उदय करण्याचा हा जणू प्रयत्न तर नव्हे ना? अशा प्रकारे आपल्या अधिकारांचे शस्त्र वापरून पत्रकार आणि पत्रकारीतेचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा हा डाव आहे. मात्र, एकनिष्ठ आणि इमानदार पत्रकार जिवंत असेपर्यंत तो यशस्वी होणार नाही, हे देखील सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे.”पत्रकारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची आणि कोणत्याही दबावाशिवाय निर्भीड पत्रकारिता करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. ही शिक्षा म्हणजे पत्रकारांना भीती दाखवून राजकीय नेत्यांच्या विरोधात आवाज उठवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मुर्तिजापूरच्या पत्रकार बांधवांनी केला आहे. न्याय न मिळाल्यास जेलभरो आंदोलनसमस्त पत्रकार बांधवांनी माननीय मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती केली आहे की, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित महिला पत्रकारासह इतर सहकाऱ्यास त्वरित न्याय मिळवून द्यावा.या मागणीची दखल न घेतल्यास, मुर्तिजापूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. निवेदनामध्ये ‘जेलभरो आंदोलन’ करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची सर्व जबाबदारी पूर्णपणे शासन व प्रशासनाची राहील, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी, ही नम्र विनंती, असे आवाहन मुर्तिजापूर तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांनी केले आहे.निवेदन सादर करणारे:समस्त पत्रकार बांधव, तालुका मुर्तिजापूर, जि. अकोला.








