
मुर्तीजापूर (जि. अकोला): थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मुर्तीजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३:१५ ते ३:४५ च्या सुमारास दुर्गवाडा येथे घडली.नेमकी घटना काय?फिर्यादी उमेश शिवदास डिके (वय ३९, रा. बँक कॉलनी, मुर्तीजापूर) हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (महावितरण) येथे नोकरीस असून सध्या दुर्गवाडा येथे कार्यरत आहेत. मंगळवारी दुपारी ते आपल्या सहकाऱ्यांसह दुर्गवाडा परिसरात प्रलंबित वीज बिलांच्या वसुलीसाठी गेले होते.यावेळी आरोपी श्रीकृष्ण शंकर घनगावकर (वय ३५, रा. दुर्गवाडा) याने फिर्यादीच्या कामात अडथळा निर्माण केला. “तुमची लाईन नेहमी चालू-बंद असते, मग आम्ही कशाचे लाईट बिल द्यायचे?” असा सवाल करत त्याने शासकीय कामात अडकाव केला. फिर्यादीने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडण्यास सांगितले. मात्र, याचा राग येऊन आरोपीने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.पोलीस कारवाईयाप्रकरणी उमेश डिके यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुर्तीजापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपी श्रीकृष्ण घनगावकर विरुद्ध खालील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे: * भारतीय न्याय संहिता (BNS): कलम २२१ (शासकीय कामात अडथळा), २९६ (अश्लील कृत्य/शब्द), आणि ३५१ (२) (धमकावणे).सदर गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली ASI विजय मानकर (ब.नं. ११९०) हे करीत आहेत.








