
भद्रावती तालुका प्रतिनिधी/ सुनिल दैदावार भद्रावती : तालुक्यातील सायवन गावाजवळ सुरू असलेल्या महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या राख टाकण्याच्या प्रक्रियेविरोधात भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती महिला मोर्चा ग्रामीण चंद्रपूर जिल्हा महामंत्री तसेच भद्रावती महिला मोर्चा ग्रामीणच्या तालुकाध्यक्ष रक्षिता निरंजने यांनी बुधवारी प्रशासनाकडे ठाम भूमिका मांडली. यासंदर्भात त्यांनी तहसीलदार भद्रावती व उपविभागीय अधिकारी वरोरा यांना सविस्तर निवेदन सादर केले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाऔष्णिक विद्युत केंद्रातून मोठ्या प्रमाणावर राख सायवन गावाच्या परिसरात टाकण्यात येत आहे. राख वाहतुकीदरम्यान ही राख हवेत उडून संपूर्ण परिसरात पसरत असून गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक व महिलांच्या आरोग्यावर याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. सतत उडणाऱ्या राखेमुळे श्वसनाचे आजार, खोकला, दमा, डोळ्यांची जळजळ, त्वचारोग यांसारख्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.या राखेमुळे शेतीवरही विपरीत परिणाम होत असून पिकांचे नुकसान होत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोतही दूषित होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ प्रदूषणापुरता मर्यादित नसून तो थेट मानवी आरोग्य व उपजीविकेशी संबंधित असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या समस्येकडे लक्ष देवून यावर उपाययोजना करण्षाची विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या वेळी भद्रावती महिला मोर्चा ग्रामीणच्या वतीने निवेदन देताना ज्योती शेडमाके, लालाजी साव, पत्रु गेडाम, बादल अलोने, वंदना दुर्वे, प्रफुल शेडमाके, मंगेश जूमनाके, मनोहर तलांडे, प्रविण मेश्राम, विजय गायकवाड, सुनील जुनघरे, आशिष नगराळे, रामवती ताई व सुजाता चिवंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रशासनाने या निवेदनाची दखल घेत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा गावकऱ्यांसह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.







