
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / नरेश राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राळेगाव शहर अध्यक्ष तथा पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावान कार्यकर्ते प्रकाश माधवराव खुडसंगे यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौ. वर्षाताई निकम यांच्याकडे सादर केला आहे.प्रकाश खुडसंगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्यरत होते. राळेगाव शहर अध्यक्ष या नात्याने त्यांनी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी, सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.राजीनाम्याबाबत माहिती देताना त्यांनी नमूद केले आहे की, सध्या काही वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या कामकाजाला अपेक्षित वेळ व न्याय देता येत नसल्याने, पक्षाच्या कार्यावर कोणताही परिणाम होऊ नये या उद्देशाने त्यांनी स्वेच्छेने हा निर्णय घेतला आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या, विश्वास व सन्मानाबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत.दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर प्रकाश खुडसंगे यांनी पुढील काळात आपली राजकीय भूमिका स्वतंत्रपणे ठरवण्याचा अधिकार राखून ठेवला असून, भविष्यात योग्य वेळी ते कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेऊ शकतात, असेही संकेत त्यांनी दिले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे राळेगाव तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.प्रकाश खुडसंगे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक संघटनात पुढील काळात काय बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







