
अकोला मनीष राऊत:नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालांनंतर मूर्तीजापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षात मोठ्या आशेने प्रवेश केलेल्या उमेदवारांच्या पराभवामुळे आता नागरिक आणि राजकीय विश्लेषकांमध्ये एका नव्या ‘षडयंत्रा’ची चर्चा रंगू लागली आहे. “निवडणुकीपूर्वी ज्यांनी ज्यांनी भाजपचा झेंडा हाती धरला, ते सर्वच पराभूत झाले आणि मूळचे भाजपचे उमेदवार मात्र निवडून आले,” हा निव्वळ योगायोग आहे की पक्षाने रचलेला एखादा सुनियोजित ‘ट्रॅप’ (सापळा), असा प्रश्न आता विचारला जात आहे.
विरोधकांना संपवण्यासाठी ‘चॉकलेट’चा वापर?
शहरातील पारावर आणि चौकाचौकात सध्या एकच चर्चा सुरू आहे की, जे उमेदवार आपल्या मूळ पक्षातून किंवा अपक्ष म्हणून ताकदवान होते त्यांना भाजपने पक्षात घेऊन एका अर्थाने ‘न्यूट्रलाईज’ (निष्प्रभ) केले का?नागरिकांच्या मते, हे उमेदवार जर त्यांच्या जुन्या पक्षाकडून लढले असते, तर त्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले असते.
मात्र, त्यांना पक्षात घेऊन उमेदवारीचे ‘चॉकलेट‘ दाखवण्यात आले आणि ऐन निवडणुकीत त्यांची ताकद मर्यादित करण्यात आली, असा सूर सध्या उमटत आहे.
नगराध्यक्ष पदासाठी ‘बळी’ दिला का?
सर्वात खळबळजनक चर्चा ही नगराध्यक्ष पदाच्या समीकरणांबद्दल आहे. आपला नगराध्यक्ष बसवण्यासाठी आणि पक्षांतर्गत वर्चस्व टिकवण्यासाठी भाजपने या नवख्या उमेदवारांचा ‘राजकीय बळी’ दिला का? अशा प्रकारचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
“विरोधकांचे तगडे उमेदवार फोडून त्यांना आपल्याच पक्षात घ्यायचे आणि नंतर निवडणुकीच्या रिंगणात त्यांना एकाकी पाडायचे,”
हे भाजपचे ‘इलेक्शन मॉडेल’ तर नाही ना
काय म्हणतात नागरिक? “हे तर राजकीय षडयंत्र!”: “जर हे उमेदवार आपल्या मूळ पक्षातून लढले असते, तर भाजपला निवडणूक जिंकणे कठीण गेले असते. त्यांना पक्षात घेऊन भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले; एक म्हणजे विरोधक कमकुवत केले आणि दुसरे म्हणजे निवडणुकीत त्यांना पाडून स्वतःचा रस्ता मोकळा केला,” असे मत एका ज्येष्ठ नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले.
उमेदवारांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’: पक्षात प्रवेश केलेल्या या उमेदवारांची अवस्था आता विचित्र झाली आहे. त्यांनी भाजपसाठी आपला जुना पक्ष सोडला, पण आता पराभवामुळे त्यांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आले आहे.
भाजपचा हा ‘मास्टर प्लॅन’ की केवळ योगायोग?पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असले, तरी लोकांच्या मनातील संशय दूर झालेला नाही. “पक्ष वाढवण्यासाठी आम्ही सर्वांना सोबत घेतो,” असे स्पष्टीकरण भाजपकडून दिले जात असले, तरी ‘पक्ष प्रवेश = पराभव’ हे समीकरण मूर्तीजापुरात सध्या तरी चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे.
या सर्व प्रकारामुळे येणाऱ्या काळात मूर्तीजापूरचे राजकारण कोणते वळण घेते आणि हे ‘बळी’ ठरलेले उमेदवार आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






