
मुर्तिजापूर प्रतिनिधी कार्यकारी संपादक विलास सावळे | मुर्तिजापुर शहरात आज एका वायरल झालेल्या क्लिपमुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती नेमकी कोण आहे, याबाबत अद्यापही स्पष्टता नसली तरी क्लिपमधील कथित वक्तव्यांमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.
वायरल क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती असे सांगताना ऐकू येत आहे की, भाजपला मतदान करणाऱ्या काही मतदारांनीसुद्धा विरोधी उमेदवारांकडून पैसे घेतल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हे पैसे नेमके कोणी घेतले, किती लोक सहभागी होते आणि हा प्रकार कितपत सत्य आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरीही या क्लिपमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागरिकांमध्ये या घटनेमुळे लोकशाही प्रक्रियेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. “यावेळी सामान्य माणसाच्या मतापेक्षा धनशक्तीचाच प्रभाव अधिक दिसून येतो. जर निवडणुका पैशांच्या जोरावरच जिंकल्या जाणार असतील, तर सामान्य नागरिक कसा टिकणार?” असा सवाल अनेक नागरिकांकडून केला जात आहे.

वायरल व्हिडिओमध्ये एका प्रभागातच लाखो रुपयांचा खर्च झाल्याचा उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे मुर्तिजापुरातील इतर प्रभागांमध्ये किती मोठ्या प्रमाणात पैसा वापरण्यात आला असेल, याबाबतही शंका व्यक्त होत आहे. “सध्या फक्त पैसा चालतोय,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली आहे.
तसेच, जर लाखो रुपये खर्च करून निवडून आलेले उमेदवार निवडणूक खर्चाच्या हिशोबात कमी रक्कम दाखवत असतील, तर हा गंभीर प्रकार ठरू शकतो. अशा परिस्थितीत निवडणूक प्रशासन खर्चाचा संपूर्ण आणि पारदर्शक हिशोब घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा चौकशी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र वायरल क्लिपमुळे निर्माण झालेल्या चर्चेमुळे मुर्तिजापुरातील राजकारणात मोठा “राजकीय भूकंप” झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे







