
मूर्तीजापूर प्रतिनिधी कार्यकारी संपादक विलास सावळे | शेतकरी आणि संघर्ष जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. मूर्तीजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर काही केल्या कमी होताना दिसत नाही. गेल्या दिवाळीत हक्काच्या मागण्यांसाठी ‘झोरा भरो’ आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता नवीन वर्षाची सुरुवातही आंदोलनानेच करावी लागणार आहे. येत्या २ जानेवारीला नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा भव्य ‘ट्रॅक्टर मोर्चा’ धडकणार असून, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत.
दिवाळीत ‘ झोरा भरो’, आता ‘ट्रॅक्टर मोर्चा’
दिवाळी हा आनंदाचा सण, पण मूर्तीजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा सणही आंदोलनाच्या सावटात घालवला. ‘झोरा भरो’ आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरात अपेक्षित न्याय पडलेला नाही. आता नवीन वर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी नाफेड कंपनीच्या धोरणांविरुद्ध एल्गार पुकारला आहे. सण असो वा उत्सव, शेतकऱ्यांचा संघर्ष मात्र पाचवीलाच पुजलेला आहे, अशा भावना तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

नाफेड केंद्रावरील प्रश्नांचा गुंताशेतमालाची खरेदी, बारदानाची उपलब्धता, पेमेंटमध्ये होणारा विलंब आणि शेतकऱ्यांना माल वापस व नोंदणी प्रक्रियेतील त्रुटी यांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. नाफेड केंद्रावर होणारी अडवणूक थांबवण्यासाठी आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी होणाऱ्या या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच पळापळ होण्याची शक्यता आहे.
प्रशासन दखल घेणार का?

नेहमीच आश्वासनांची खैरात करणाऱ्या प्रशासनाला आता शेतकऱ्यांच्या थेट प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. दोन तारखेचा हा मोर्चा केवळ निदर्शन नसून तो शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने या समस्यांचे गांभीर्य ओळखून ठोस पावले उचलली नाहीत, तर हा संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत शेतकरी संघटनांनी दिले आहेत.
“शेतकऱ्यांचा संघर्ष कधी संपणार?” हा प्रश्न आता प्रत्येक कष्टकऱ्याच्या मनात घर करून आहे. येणारा ट्रॅक्टर मोर्चा नाफेड आणि प्रशासनाला जाग आणेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल





