
दर्यापूर अमोल चव्हाण (अमरावती):दर्यापूर तालुक्यातील चाडोळा येथील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने आवाज उठवण्यात आला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारणे, शहानूर नदीवर नवीन पुलाचे बांधकाम करणे आणि मातंग समाजातील गरजूंना घरकुल मिळवून देणे, या मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष उमेशभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.स्मारकासाठी ३५ लाखांच्या निधीची मागणीलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी चाडोळा येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी जुनी मागणी आहे. या स्मारकासाठी साधारण ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन हे कार्य तातडीने पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. उमेशभाऊ चव्हाण म्हणाले की, “अण्णाभाऊंचे साहित्य आणि कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून, हे स्मारक गावाच्या अस्मितेचे प्रतीक ठरेल.”नदीवरील पूल आणि घरकुलाचा प्रश्न ऐरणीवरस्मारकासोबतच चाडोळा येथील ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न सोडवण्यासाठी चाडोळा ते दहिहाडा दरम्यान शहानूर नदीवर नवीन पुलाचे बांधकाम करण्यात यावे, ही महत्त्वाची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पावसाळ्यात पुलाअभावी नागरिकांचे हाल होतात, त्यामुळे हा पूल होणे अत्यंत गरजेचे आहे.तसेच, चाडोळा येथील नवीन पोल्ट्री परिसरातील मातंग समाज बांधवांना अद्याप हक्काच्या घरांची प्रतीक्षा आहे. या भागातील गरजू कुटुंबांना तातडीने घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा, जेणेकरून त्यांचे जीवनमान सुधारेल, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय मातंग संघाने केली आहे.प्रशासनाला इशारायावेळी अखिल भारतीय मातंग संघाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आता या मागण्यांवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.








