क्रांतिज्योती सावित्रीच्या लेकींच्या सन्मान सोहळ्यातरिना टेंभुर्णे मॅडम यांचा गौरव

0
11

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :- नरेश राऊत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित “क्रांतिज्योती सावित्रीच्या लेकींचा सन्मान सोहळा–२०२६” अंतर्गत जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी यवतमाळ येथील सहकार भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या सन्मान सोहळ्यात शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या टी.सी. मा. रिना निखिल टेंभुर्णे मॅडम यांचा उत्कृष्ट मूल्यवर्धन प्रशिक्षण, प्रभावी अंमलबजावणी व शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.तालुका पांढरकवडा येथील अतिशय दुर्गम, जंगलमय तसेच हिंस्र प्राण्यांचा वावर असलेल्या भागात प्रत्यक्ष शाळा भेटी घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यवर्धन उपक्रम प्रभावीपणे राबविणे, शिक्षकांना सातत्याने मार्गदर्शन करणे तसेच शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी केलेले अथक परिश्रम, निष्ठा व समर्पण याची दखल घेऊन त्यांना “क्रांतिज्योती सावित्रीच्या लेकीचा सन्मान” प्रदान करण्यात आला.विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंस्कार रुजविणे, शिक्षकांना प्रेरित करणे व शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता उंचावण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थित मान्यवर, शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी श्रीमती मधुमती सांगळे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यवतमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी महिला सक्षमीकरण, शिक्षणातील गुणवत्ता व शिक्षकांची भूमिका यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here