“भूमी अभिलेख कार्यालय की दलालांचे अड्डे? मुर्तिजापूरात नागरिकांचा प्रशासनावर थेट सवाल”

0
20

अकोला | प्रतिनिधी मनीष राऊत

शासनाचा पगार घेऊन शासनालाच हरताळ फासण्याचे काम जर शासकीय कार्यालयात खुलेआम सुरू असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे? हाच संतप्त सवाल आज मुर्तिजापूर शहरात उपस्थित झाला आहे. येथील भूमी अभिलेख कार्यालय सध्या कथित शासकीय दलालांच्या ताब्यात गेले असून, कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी **युसुफ** यांची अधिकृत बदली बाळापूर येथे झाली असतानाही, संबंधित कर्मचारी बाळापूर कार्यालयात कमी आणि मुर्तिजापूर कार्यालयातच अधिक वेळा वावरत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. बदली होऊनही मूळ ठिकाणी खुलेआम उपस्थिती राहणे, यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे.

नागरिकांच्या आरोपानुसार, भूमी अभिलेख कार्यालयातील कोणतेही काम दलाली दिल्याशिवाय पुढे सरकत नाही. जमिनीची मोजणी, नोंदी, दुरुस्ती, उतारे आदी शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार फिरवले जाते. शासकीय काम बाजूला ठेवून खाजगी दलाली, व्यवहार लावणे, लोकांना अडवणे हाच जणू काही कार्यालयाचा मुख्य उद्देश बनल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.

प्रशासनाचा पगार आणि काम मात्र दलालांचे” अशी अवस्था आज भूमी अभिलेख कार्यालयाची झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या कथित दलालीतून संबंधित कर्मचाऱ्याने मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केल्याची चर्चा असून, तो सध्या प्लॉटिंग व जमीन व्यवहार व्यवसायातही सक्रिय असल्याचे आरोप पुढे येत आहेत. शासकीय पदाचा गैरवापर करून जमिनीचे व्यवहार आपल्या मर्जीनुसार वळवले जात असल्याचा आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये संबंधित कर्मचाऱ्याची ‘मजबूत पकड’ असल्यामुळे आजवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. बदली होऊनही कर्मचारी मूळ ठिकाणी मुक्तपणे वावरत असेल, तर प्रशासन झोपले आहे की जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

जर हा प्रकार तात्काळ थांबवण्यात आला नाही, तर भूमी अभिलेख कार्यालय हे जनतेसाठी नव्हे तर दलालांसाठीच कार्यरत असल्याचा ठपका बसेल, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. या प्रकरणाची **जिल्हाधिकारी, भूमी अभिलेख उपसंचालक व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी**, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here