
अकोला मनिष राऊत | प्रतिनिधी:अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असतानाच, शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील बहुजन नगर येथील नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. “सुविधा नाही, तर मतदान नाही” अशी ठाम भूमिका घेत संपूर्ण परिसरातील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.प्रशासनाची उडाली झोपविशेष म्हणजे, आज ४ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकोला क्रिकेट क्लब मैदानावर ‘विजय संकल्प सभा’ पार पडली. मुख्यमंत्री ज्या मार्गाने जाणार होते, त्याच मुख्य रस्त्यावर शिवणी परिसरातील नागरिकांनी मोठे बॅनर्स आणि होर्डिंग लावून आपला निषेध नोंदवला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे निषेधाचे फलक लागल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.पोलिसांची विनंती धुडकावलीमिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी हे बॅनर हटवण्याची विनंती नागरिकांना केली होती. मात्र, संतप्त नागरिकांनी त्याला ठाम नकार दिल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हक्काच्या सुविधा मिळत नसल्याने नागरिक आता कोणत्याही तडजोडीच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे.५ वर्षे झाली, पण विकास कुठे?या परिसराचा महानगरपालिका हद्दीत समावेश होऊन ५ वर्षे पूर्ण झाली आहेत, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. नागरिकांच्या मुख्य तक्रारी खालीलप्रमाणे आहेत: * रस्ते आणि सांडपाणी: अद्याप पक्के रस्ते आणि नाल्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. * पावसाळ्यातील हाल: पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते. * पाणीटंचाई: उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.”आम्ही कर भरतो, मग आम्हाला साध्या मूलभूत सुविधा का मिळत नाहीत?” असा संतप्त सवाल येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. आता या बहिष्काराच्या पवित्र्यानंतर प्रशासन आणि राजकीय नेते काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








